गुन्हेगारीमहाराष्ट्र

शांतपणे काम करणारा, संयत, सर्वसामान्य पोलीसच पोलीस दलाची घसरलेली पत, प्रतिष्ठा व विश्वासाहर्ता परत मिळवून देईल..! जय जीत सिंह

मुंबई news18marathi:-

शांतपणे काम करणारा, संयत, सर्वसामान्य पोलीसच पोलीस दलाची घसरलेली पत, प्रतिष्ठा व विश्वासाहर्ता परत मिळवून देईल!
जय जित सिंह

मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तिची जाहीरपणे छाननी सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांवरील जनतेच्या विश्वासास मोठा तडा गेला असून असून त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लगेच भरून निघण्याजोगे नाही. जनसामान्यांच्या नजरेत पोलीस व्यवस्थेबाबत अविश्वास स्पष्टपणे दिसू लागला आहे. पोलीस दलाच्या प्रतिमेस अपरिमित हानी पोहोचली असून ती भरून काढण्यासाठी आज तरी समोर कोणताही तत्काळ उपाय दिसत नाही. त्यामुळेच हे सर्व मळभ हटविण्यासाठी प्रामाणिकपणे, विनम्रपणे व चिकाटीने आपले काम नियमितपणे करणाऱया सर्वसामान्य पोलिसास केंद्रस्थानी ठेवूनच पुढील मार्गक्रमण करणे क्रमप्राप्त झाले आहे.
बदलत्या काळानुसार सर्वसामान्य जनतेच्या मनातील पोलिसांची प्रतिमा ही एकतर ‘गुन्हेगार पोलीस’, ‘दिखाऊ पोलीस’ किंवा ‘असामान्य शक्तिशाली पोलीस’ अशी बनत गेली आहे. त्यामुळे दुर्दैवाने एकतर उतावीळ व उध्दट किंवा थेट अतिमानवी क्षमता असलेला असामान्य शक्तिशाली असा सुपरकॉप असे पोलिसांच्या प्रतिमेचे सरळ सरळ दोन विरुद्ध टोकांमध्ये विभाजन झालेले दिसते.
परंतु सुदैवाने या देखाव्याच्या पलीकडे मुंबई-महाराष्ट्राच्या पोलीस दलाची एक अतिशय स्थिर व स्थायी अशी रचना आणि व्यवस्था आहे. पोलीस दलातील विविध स्तरांवर शांतपणे, दृढतेने व अविचलपणे कार्यरत असणारे, परंतु कधीही प्रकाशझोतात न येणारे व थेट नजरेत न भरणारे अनेक सर्वसामान्य पोलीस अधिकारी व अंमलदार हे या स्थिर व स्थायी पोलीस व्यवस्थेचे खरे आधारस्तंभ आहेत. हे सर्वसामान्य पोलीस कधीही तत्काळ उपाय शोधण्याच्या नादात नियमांचा भंग करीत नाहीत किंवा स्वतःच्या गौरवासाठी अथवा स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी कोणत्याही चुकीच्या भानगडीत पडत नाहीत. त्यांनी कधीही एखादी दैदीप्यमान कामगिरी केलेली नसते, परंतु हेच सर्वसामान्य पोलीस अढळपणे व सातत्याने आपले नियमित कर्तव्य पार पाडून मुंबईसारख्या अफाट व गुंतागुंतीच्या शहरातील आर्थिक, धार्मिक व जातीय विषमता, आर्थिक चढाव-उतार तसेच उच्चभ्रू गुन्हेगारी टोळय़ांच्या कारवाया यामधून मार्ग काढत या महानगरीचे चक्र सदैव फिरते ठेवण्यात असामान्य योगदान देत असतात.
हे स्थानिक पातळीवर काम करणारे तळागाळातील सर्वसामान्य पोलीस त्यांचे फक्त दैनंदिन कर्तव्येच पार पाडत नाहीत, तर अविरत कष्ट घेऊन पोलीस दलाचा लौकिक व त्याची वर्षानुवर्षांची उज्ज्वल परंपरा अबाधित ठेवून ती आपल्या खांद्यावर पेलत पुढे नेत असतात. हे सर्वसामान्य पोलीस गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी झोपडपट्टय़ांमधील अरुंद, कोंदट व अंधाऱया गल्ल्या, अनधिकृत वेश्या व्यवसायासाठी बदनाम झालेले इलाखे व जुगाराच्या अड्डय़ांचा अतिशय चिवटपणे व एका संशोधकाच्या उत्साहाने शोध घेत असतात. त्याचवेळी ते सफेतपोष उच्चभू गुन्हेगारांच्या क्लृप्त्याही समजून घेत असतात. धार्मिकदृष्टय़ा संवेदनशील कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये म्हणून ते सामान्य माणसाच्या अंतर्मनातील सांस्कृतिक, पारंपरिक व भावनिक बारकाव्यांचाही अचूक वेध घेत असतात. ते तळागाळातील लोकांशी नित्यनवीन वैयक्तिक संबंध जोडत असतात. खबऱयांचे जाळे तयार करून ते जोपासत असतात व पोलीस कामातील ज्ञान वृद्धिंगत करीत आपले कर्तव्य व्यावसायिक रीतीने चोखपणे पार पाडत असतात. कोणताही ‘सुराग’ मिळाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई करताना वेळोवेळी अपयश येऊनही त्यातून काहीतरी शाश्वत हाती लागेपर्यंत ते काळवेळेचा व वैयक्तिक असुविधेचा विचार न करता त्याचा अविरत कष्ट करण्यामागे पैसा किंवा प्रसिद्धी ही प्रेरणा कधीही नसते. हे सर्व फक्त त्यांची कामाप्रती असलेली निस्सीम श्रद्धा व पोलिस दलाच्या कामांमध्ये त्यांना वाटणारा अभिमान, यासाठी त्यासाठी ते करत असतात
आय.पी.एस तसेच राज्य संवर्गातील अनेक वरिष्ठ अधिकारी हे देखील कठीण परिस्थितीत अचूक निर्णय घेऊन अनेक अभियानामध्ये स्वतः उतरतात. त्यातील अतिवरिष्ठ अधिकारी हे पोलीस दलात दळणवळणाच्या व इतर आवश्यक सुविधा पुरवणे, गणवेश व शस्त्रास्त्रे पुरवणे,व पोलिसांची राहण्याची व आरोग्याची व्यवस्था करणे, इत्यादी साठी कराव्या लागणाऱ्या नियोजनामध्ये सातत्याने तासनतास आखणी करत असतात. त्यांचे मूल्यांकन व दुरुस्ती करत असतात. असे अधिकारी अभावानेच वार्ताहर परिषदा घेताना किंवा रक्षणकर्ते / तारणहार म्हणून शेखी मिरवताना दिसतात. परंतु, तरीही ते पोलीस दलासाठी अभीकेंद्र बाळाची महत्त्वाची भूमिका निभावत असतात. पोलीस दलाच्या अडसररहित अविरत कामकाजामध्ये नित्य महत्त्वपूर्ण योगदान देत असतात.
बऱ्याचदा चाकोरीबाहेरील अस्वभाविक काम करणाऱ्या अपवादात्मक पोलीस अधिकारी व अंमलदार हे प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी असतात. परंतु वर उल्लेख केलेले प्रामाणिक, विनम्र व चिकाटीने नियमित काम करणारे तळागाळातील सर्वसामान्य पोलीस हेच या पोलीस दलाचा खरा कणा आहेत, हे कधीही विसरून चालणार नाही. तेही मनुष्यप्राणी आहेत व त्यांच्याही हातुन चुका होणारच.परंतु, पोलीस दलाच्या संस्थात्मक रचनेशी त्यांची असलेली निष्ठा व वैयक्तिक इच्छा,आकांक्षा,व आत्मगौरवापेक्षा पोलीसदलाच्या कामाचेच त्यांच्यासाठी असलेले अनन्यसाधारण महत्त्व हे त्यांना नेमून दिलेल्या कर्तव्यापासून शक्यतो भरकटू देत नाही. या सर्वांची संयत,वरकरणी अदुश्य,विनीत व एकदम डोळ्यात भरणार नाही अशी पोलीस दलातील उपस्थिती व अविरत कष्टच पोलीस दलास त्यांची गत विश्वासाहर्ता परत मिळवून देतील, पोलीस दलाचा विश्वास तारुण नेतील . पोलीस दलाच्या अव्याहत,नित्य व तत्पर कर्तव्यपूर्ती मध्ये याच सामान्य पोलिसांचा खरा सहभाग आहे स्वतःच्या वैयक्तिक आत्मगौरवाचा व कौतुकाचा कधीही विचार न करता आपले काम प्रामाणिकपणे करणारा हा सर्वसामान्य पोलीसच सध्याच्या संकटावर मात करून पोलिस दलाची गत प्रतिष्ठा त्यात परत मिळवून देऊ शकतो,हे निश्चित..!

(लेखक महाराष्ट्र पोलीस कॅडरमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.)

शब्दांकन :  ज्ञानेश्वर रायभान वाघ, पो.नि. एटीएस, मुंबई 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे