ब्रेकिंग

मनपा आरोग्याधिकारी डॉ. बोरगेंचे वर्तन संशयास्पद..!! पोलिस अधीक्षक पाटील यांचे मनपा आयुक्त गोरे यांना खरमरीत पत्र❓

अहमदनगर प्रतिनिधी:- महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचे वर्तन संशयास्पद असून, रेमडीसीवीर इंजेक्शन प्रकरणी कोतवाली पोलिसांनी चौकशीला बोलावले असतानाही ते येत नाहीत. रेमडीसीवीर इंजेक्शन बाबत गैरप्रकार होत असल्या बाबत सध्या प्रसार माध्यमांव्दारे माहिती प्रसारित होत असल्याने जनमानसांत याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना डॉ. बोरगे चौकशीसाठी येत नसल्याने या बाबत आवश्यक कार्यवाहीची गरज आहे, अशा खरमरीत शब्दांचे पत्र पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना पाठवले आहे. आता या पत्राबाबत आयुक्त गोरे काय भूमिका घेतात व डॉ. बोरगे कोतवाली पोलिसांच्या चौकशीला कधी सामोरे जातात, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

पोलिस अधीक्षक पाटील यांनी आयुक्त गोरे यांना पाठवलेल्या पत्रात डॉ. अनिल बोेरगे (आरोग्य अधिकारी, महापालिका अहमदनगर)यांच्या संशयास्पद वर्तणुकीबाबत, असा स्पष्ट उल्लेख करून पुढे म्हटले आहेकी, दि. 24 एप्रिल रोजी रात्री 8.40 च्या सुमारास रेणुकामाता हॉस्पिटल (केडगाव, अहमदनगर) येथील डॉ. संदीप वाळुंज हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्यांनी त्यांचे नातेवाईक योगेश औटी (कंत्राटी कामगार, आरोग्य विभाग, महापालिका, अहमदनगर) यांना बालदोटा एजन्सी येथून रेमडीसीवीर इंजेक्शन घेऊन येण्याबाबत सांगितले होते.परंतु औटी यांनी बलदोटा एजन्सी येथून रेमडीसीवीर इंजेक्शन घेतल्या नंतर हे इंजेक्शन रेणुकामाता हॉस्पिटल येथे तात्काळ पोहोच करणे अपेक्षित असताना देखील ते तेथे पोहोच न करता डॉ. बोरगे यांच्या महापालिका कार्यालयात जाऊन थांबले. या ठिकाणी शिवसेना पक्षाचे दिलीप सातपुते व इतर कार्यकर्ते यांनी येऊन रेमडीसीवीर इंजेक्शन बाबत विचारणा करू लागल्यानंतर औटी यांनी रेमडीसीवीर इंजेक्शन रेणुकामाता हॉस्पिटलला पोहोच केले. या घटनेमध्ये औटी यांनी अनियमितता केली असल्याचे दिसून येत आहे, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच या घटनेच्या ठिकाणी पोलिस येत असल्याची माहिती मिळताच डॉ. बोरगे त्यांच्या कार्यालयातून निघून गेले. त्यामुळे त्यांच्या मोबाईलवर संपर्क करुन त्यांना पोलिस स्टेशन किंवा त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलविले असताना देखील ते आले नाहीत. पोलिसांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रेमडीसीवीर इंजेक्शन किंवा कोणताही पुरावा मिळाला नाही, त्यामुळे कारवाई करता आली नाही तसेच डॉ. बोरगे यांना वारंवार फोन करून चौकशी साठी बोलविले असता ते पोलिस ठाण्यात हजर झाले नाहीत. त्यामुळे रेमडीसीवीर इंजेक्शन बाबत त्यांच्या कार्यालयात घडलेला घटनाक्रम वत्याअनुषंगाने डॉ. बोरगे यांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. रेमडीसीवीर इंजेक्शन बाबत गैरप्रकार होत असल्याबाबत सध्या प्रसार माध्यमांव्दारे माहिती प्रसारित होत असल्याने जनमानसात याबाबत संभ्रम निर्माण झालेला असल्याने या प्रकरणात उचित कार्यवाही गरजेची आहे, असेही पोलिस अधीक्षक पाटील यांनी आयुक्त गोरे यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. या पत्रा समवेत कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांचा अहवालही आयुक्त गोरेंना पाठवण्यात आला आहे.

□स्टेशन डायरीला घेतली नोंद
कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी 24 एप्रिल रोजी मनपात घडलेल्या घटनेची नोंद पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीत घेतली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 24एप्रिल रोजी रात्री 8.40च्या सुमारास हद्दीत जीप पेट्रोलिंग करित असताना शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फ़ोनवर कळविले की जुनी महापालिका येथेडॉ.बोरगे यांच्या कार्यालयात कंत्राटी कामगार योगेश औटी कडे पाच रेमडीसीवीर इंजेक्शन आहेत. तुम्ही तात्काळ येथे या असे सांगितल्याने सहायक पोलिसनिरीक्षक रणदिवे यांना तेथे बोलावून घेतले. त्यावेळी सातपुते व शिवसेना पक्ष कार्यकर्ते जमले होते. तेथे त्यांनी आम्हाला वरील हकगित सांगितली व डॉ.बोरगेहे कार्यालयात नसून ते आत्ताच निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर औटी ला बोलावून घेतले व त्याच्याकडून माहिती घेतली. अशोक बलदोटा एजन्सी माणिकचौक येथून 5 इंजेक्शन घेऊन जुनी मनपा येथे आलो व तेथे डॉ.बोरगे यांच्याकडे थांबलो. मात्र ते सर्व इंजेक्शन रेणुकामाता हॉस्पिटलमध्ये जमा करुन आलो, अशी हकिगत सांगितल्यानंतर डॉ.बोरगे यांना फोन करून जुनी मनपा येथे त्यांच्या कार्यालयात किंवा पोलिस स्टेशनला येण्याबाबत कळविले. मात्र, ते आलेले नाहीत तसेच शिवसेना कार्यकर्ते सुध्दा पोलिस स्टेशनला कोणतीही तक्रार न देता निघून गेले. मात्र, हे प्रकरण संवेदनशील असल्याने सहायक पोलिस निरीक्षक रणदिवे यांना या प्रकरणी चौकशी अंती योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे या नोंदीत म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे