बीड जिल्ह्यातील नारायण गडावर यंदा पहिल्यांदाच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा समाज बांधव नारायण गडावर मेळाव्यासाठी जमले आहेत.
मनोज जरागे यांनी भाषणाची सुरुवात करतानाच अग बया बया बया.. असे म्हणत नारायण गडावर नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी असल्याचं म्हटलं. तसेच, मी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो, असेही ते म्हणाले.
बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी ते नारायणगड अशी 30 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. बीडकडे येणाऱ्या चारही मार्गावर चक्का जाम झाला असून नारायण गडावरील मैदान मेळव्यासाठी आलेल्या गर्दीने फुलून गेलंय.
जरांगे पाटील यांच्या मेळाव्यासाठी मराठा समाज बांधवांनी केलेली गर्दी या मेळाव्याची व मनोज जरांगे यांची ताकद दाखवणारी आहे.