यंदा १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2024) आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते. समुद्रमंथनात हलाहल विषानंतर, ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. कल्किपुराणानुसार अलक्ष्मी कलिराक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी, मृत्यूची, अधर्माची माता आहे. आळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ आणि वासना, असत्य, अस्वच्छता, अनीती, भ्रष्टाचार व अज्ञान यांची देवता. कलियुगात जुगार, दारू, वेश्याव्यवसाय, कत्तल, लोभ येथे राहणे अलक्ष्मीला आवडते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणात अलक्ष्मीची कथा आहे, तर श्रीसुक्तातही अलक्ष्मी नाश्याम्यहं, म्हणजेच अलक्ष्मीचा नाश व्हावा, असे वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव, तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. याच झाडूच्या साहायाने अलक्ष्मीला घरातून पळवून लावले जाते, अशी त्यामागची भावना आहे.
झाडूची पूजा कशी करावी?
>> लक्ष्मी पूजेच्या दिवशी नवीन झाडू विकत घेण्याची आणि तिला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे. >> लक्ष्मीपूजा झाल्यावर स्वच्छ जागी झाडू उभा करून, त्याला हळद, कुंकू लावून पूजा करतात. >> पूजा झाल्यावर रात्री उशिरा नवीन झाडून घर स्वच्छ करून अलक्ष्मी बाहेर काढतात.
झाडूचे महत्त्व लक्षात घेऊन पुढील गोष्टी टाळाव्या.
>> झाडूला पाय लावू नये, चुकून लागला तरी लगेच नमस्कार करावा. >> झाडूने कोणालाही मारू नये, लहान मुलांनाही नाही आणि प्राण्यांनाही नाही. >> कोणी घराबाहेर पडले, की लगेच झाडलोट करू नये, असे शास्त्र सांगते.
मिठाची पूजा का ?
मीठ हा लक्ष्मीचा भाऊ. तोही सुद्रमंथनात तिच्या पाठोपाठ बाहेर आला. मीठ हे संसाराचे सार आहे. ते नसेल तर आयुष्य अळणी होईल. मीठ ही निसर्गाने दिलेली भेट आहे. तिच्यावर कर आकारायला ब्रिटिशांनी सुरुवात केली, तेव्हा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता. त्याच मिठाचे महत्त्व उद्योजक टाटा यांनीही ओळखले आणि देशाचे मीठ म्हणत घरोघरी पोहोचवले. खाल्ल्या मिठाला जागणे, हा आपल्यावर झालेला संस्कार आहे. चुकून जरी हे मीठ जमिनीवर सांडले, तर त्याचे मोल कळावे, म्हणून आई वडील मुलांना धाक दाखवतात, की मीठ सांडू नये, नाहीतर ते पापण्यांनी भरावे लागते. यामागे मिठाचे महत्त्व समजावून सांगणे, एवढाच उद्देश आहे. म्हणून लक्ष्मीपूजेनंतर खडे मीठ किंवा साधे मीठ वाटीत घेऊन त्याला हात जोडून नमस्कार करावा आणि त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान ओळखून कृतज्ञताव्यक्त करावी.